प्रकरण ५

नियतकालिकांचे लाटेक्-वर्ग

अनेक नियतकालिके त्यांचे स्वतःचे लाटेक्-वर्ग वापरतात. ह्यांचे फलित अंतिम दृश्यरूपाशी मिळतेजुळते असते. अर्थात हे टंकाच्या वापरावरही अवलंबून असते. जर अशा प्रकारे नियतकालिकाचा लाटेक्-वर्ग घडवला गेला असेल, तर तो बहुतांश वेळा संपादकीय कक्षातूनच पुरवला जातो, तसेच काही वेळा हे लाटेक्-वर्ग नियतकालिकांतर्फे सीटॅनवर प्रकाशित केले जातात.

सादरीकरणे

लाटेक्-सह सादरीकरणे तयार करता येतात. slides हा लाटेक्-वर्ग मुद्रित चौकटी तयार करण्याकरिता बनवला गेला होता, त्या लाटेक्-वर्गात पडद्यावरील सादरीकरणांसाठी कोणत्याही सोयी नाहीत. लाटेक्-मध्ये हे साधण्यासाठी दोन लाटेक्-वर्ग अस्तित्वात आहेत. ते अनुक्रमे beamerpowerdot हे होत. ह्यातील बीमर हा लाटेक्-वर्ग अधिक प्रचलित असल्याने आम्ही त्याची ओळख इथे करून देऊ.

\documentclass{beamer}
\usepackage[T1]{fontenc}
\begin{document}

\begin{frame}{A first frame}
  Some text
\end{frame}

\begin{frame}{A second frame}
  Different text
  \begin{itemize}
    \item<1-> First item
    \item<2-> Second item
  \end{itemize}
\end{frame}

\end{document}

ह्या उदाहरणातील ठळक मुद्दे असे की बीमरमार्फत फलित दस्तऐवजाचे विभाजन चौकटींमध्ये (frames) होते ज्यांमध्ये अनेक पोटचौकटी (slides) असू शकतात. ह्या लाटेक्-वर्गातर्फे नेहमीच्या लाटेक्-आज्ञावलीत किंचित भर पडते. पडद्यावरील दृश्य मजकूर अंशाअंशाने प्रकट करण्याची सोयदेखील ह्या लाटेक्-वर्गात आहे. सादरीकरणांकरिता हे खूप उपयुक्त आहे, परंतु ह्या प्रकरणाच्या उद्दिष्टात ते समाविष्ट नाही, त्यामुळे ह्या अभ्यासक्रमात आम्ही ते शिकवत नाही आहोत. ह्या अनुदिनीवर बीमरमधील थांब्यांविषयी अधिक माहिती मिळवता येईल.

दृश्यकांसाठीचा लाटेक्-वर्ग

काही वेळा लाटेक् वापरून दृश्यके बनवण्याची गरज वाटू शकते. प्रविष्ट मजकुराव्यतिरिक्त इतर कोणतीच गोष्ट फलितात दिसायला नको अशीही इच्छा असू शकते. ह्याकरिता standalone हा लाटेक्-वर्ग वापरणे उचित ठरेल. ह्या लाटेक्-वर्गातर्फे फलिताचा आकार आपोआप ठरवला जातो. तो मुख्यत्वे फलितातील मजकूर अथवा मुद्रणयोग्य सामग्रीच्या आकाराइतका असतो.

\documentclass{standalone}
\usepackage[T1]{fontenc}
\begin{document}
A simple document: this will be a very small box!
\end{document}