प्रकरण १४

टंक व युनिकोड-चालक

ह्या प्रकरणात लाटेक् आज्ञावलीसह युनिकोड चिन्हे कशी हाताळली जातात व टंकांची हाताळणी कशी होते हे शिकवले जाते. ओपनटाईप टंकांचा वापर लाटेक्-सह कसा केला जातो हेही आपण पाहू.

जेव्हा टेक् व लाटेक् सुरू झाले, तेव्हा ते मुख्यत्वे युरोपीय भाषांकरिताच वापरले जात असे. काही प्रमाणात ग्रीक व रशियन ह्या लिप्यांकरिताही टेक् व लाटेक् वापरता येत असे, परंतु ह्यांव्यतिरिक्त अन्य लिप्या मात्र हाताळण्याची क्षमता त्यात नव्हती.

लॅटिन लिपीतील स्वराघाताची चिन्हे

लॅटिन लिपीतील स्वराघाताच्या चिन्हांकरिता लाटेक्-मध्ये पूर्वी आज्ञा असत. उदा. \c{c} ह्या आज्ञेमुळे लॅटिन लिपीतील ‘ç’ हे चिन्ह छापले जाईल, अथवा \'e ह्या आज्ञेसह ‘é’ हे. ज्यांना ह्या आज्ञा सवयीच्या झाल्या आहेत, ते अजूनही त्या वापरतात, परंतु कळपाटावरून थेट अशी चिन्हे टंकलिखित करणे शक्य झाल्यानंतर वापरकर्त्यांना तेदेखील वापरण्याची सोय लाटेक्-मध्ये असणे आवश्यक वाटले.

युनिकोडापूर्वी लाटेक् अक्षरांची निरनिराळी स्वरूपे पुरवत असे. उदा. latin1 ह्या स्वरूपासह वापरकर्ते ‘déjà vu’ लिहू शकत, लाटेक् अंतर्गत पातळीवर त्यांचा अनुवाद लाटेक्-आज्ञांमध्ये करत असे व त्यामुळे योग्य फलित मिळत असे.

pdflatex ह्या चालकासह अजूनही ह्या सर्व रूढी चालू आहेत, परंतु आजच्या काळात सर्व धारिका युनिकोड-आधारितच (UTF-8 स्वरूपातच) आहेत असे गृहीत धरले आहे. तसे नसेल, तर वेगळ्या आज्ञांसह ते नमूद करावे लागते. हा चालक ८-बिट टंकांपुरताच मर्यादित आहे. त्यासह बहुतांश युरोपीय लिप्यांमध्ये लिहिता येते.

टंकनिवड

pdflatex ह्या चालकासह लाटेक्-ची मूलभूत टंकनिवडीची आज्ञावली वापरता येते व आजकाल अनेक टंक सहज वापराकरिता टेक्-वितरणाचा भाग म्हणून वितरित केले जातात. उदा. टाइम्स, हेल्वेटिका व पॅलटिनोसारख्या टंकांवर आधारलेला टेक् गायर उच्च गुणवत्तेचा टंक. टेक्-वितरणात उपलब्ध असलेले टंक कोणत्याही टेक्-धारिकेत सहज निवडता व वापरता येतात. ह्या टंकांना निवडणे एका आज्ञासंचास निवडण्याइतकेच सोपे आहे. उदा. टाइम्स टंकासारखा दिसणारा लाटेक्-मधील टंक आहे टर्म्स्. तो वापरण्याकरिता पुढील उदाहरण पाहा.

\usepackage{tgtermes}

pdflatex ह्या चालकासह बहुतांश टंक हे आज्ञासंचांमार्फत वापरता येतात. द लाटेक् फॉन्ट कॅटलॉग ह्या नावाने लाटेक्-मधील टंकांची एक यादी महाजालावर उपलब्ध आहे. तसेच टेक्-वितरणातील सर्व टंक सीटॅन ह्या संकेतस्थळावर फॉन्ट ह्या विषयांतर्गत एकत्रित केले आहेत. एखाद्या टंकाचा पीडीएफ्-लाटेक् चालवू शकेल असा आज्ञासंच आहे का हे सीटॅनवर तपासून घेता येऊ शकते. अमुक्त टंकांच्या काही मुक्त प्रतिकृतीदेखील उपलब्ध असतात, त्यांचा वापर लाटेक्-सह सहज करता येतो.

युनिकोड-पर्व

pdflatex हा चालक ८-बिट स्वरूपातील टंक व अक्षरांपुरताच मर्यादित असल्यामुळे ह्या चालकासह ओपनटाईप ह्या प्रकारचे टंक वापरता येत नाहीत. तसेच ह्या चालकासह लॅटिनव्यतिरिक्त इतर लिप्या वापरणे सुकर नाही. युनिकोडआधारित मजकूर लाटेक्-सह वापरण्याकरिता दोन पर्यायी चालक लाटेक्-मध्ये उपलब्ध आहेत. त्यांची नावे झीटेक् व लुआटेक्. लाटेक्-साठी अनुक्रमे झीलाटेक् व लुआलाटेक् ही त्यांची नावे आहेत. xelatexlualatex ह्या त्यांच्या आज्ञा टेक्-धारिकांवर चालवता येतात.

ह्या चालकांसह टंकनिवड fontspec आज्ञासंचामार्फत होते सोप्या टंकनिवडीसाठी ह्याकरिताच्या आज्ञा पुढीलप्रमाणे दिसतात.

\usepackage{fontspec}
\setmainfont{texgyretermes-regular.otf}

ह्या आज्ञांमुळे टेक् गायर टर्म्स् ह्या टंकाची निवड केली जाते. ह्या पद्धतीने कोणत्याही ओपनटाईप टंकाची निवड करता येणे शक्य आहे. पीडीएफ्-लाटेक् ह्या चालकाकरिता उपलब्ध असलेले काही ८-बिट टंक त्यांच्या ओपनटाईप स्वरूपात झीलाटेक् व लुआलाटेक्-सोबतही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शिवाय संगणकावर प्रस्थापित केलेला कोणताही ओपनटाईप टंक ह्या आज्ञासंचासह निवडता येऊ शकतो. देवनागरी लिपीसाठी पुढील युनिकोडआधारित टंक टेक्-वितरणात समाविष्ट आहेत.

द लाटेक् फॉन्ट कॅटलॉग ओपनटाईप स्वरूपातील टंकांचीदेखील नोंद घेतो. त्यामुळे एक संसाधन म्हणून त्या यादीचा वापर करता येऊ शकतो. अन्यथा सीटॅनपृष्ठावर टंकांची नोंद आहेच.

योग्य टंक निवडल्यानंतर युनिकोड स्वरूपातील मजकूर थेट बीजधारिकेत समाविष्ट करता येतो. ह्या उदाहरणात काही ग्रीक अक्षरे, काही लॅटिन अक्षरे व काही चीनी, जपानी व कोरियाई अक्षरेही आहेत.

% !TEX xelatex
\documentclass{article}
\usepackage{fontspec}
\setmainfont{texgyretermes-regular.otf}
\newfontfamily\cjkfont{FandolSong-Regular.otf}
\begin{document}

ABC → αβγ → {\cjkfont 你好}

\end{document}

भाषाबदल करावयाचा असल्यास विविध कारणांसाठी babel तसेच polyglossiaसारखे आज्ञासंच वापरणे अधिक श्रेयस्कर ठरते.