प्रकरण १२

संदर्भ

ह्या प्रकरणात संदर्भ देण्याविषयीची पायाभूत माहिती देण्यात आली आहे. स्वतःची संदर्भसामग्री घडवणे शिका व तिच्यातील संदर्भ लाटेक्-मध्ये वापरणे शिका.

पाठ्यसंदर्भांकरिता बीजआज्ञावलीत जरी संदर्भांचा उल्लेख केला जात असला, तरी त्यांविषयीची माहिती दुसऱ्या धारिकांमधून वापरली जाते. बहुतांश वेळा ह्या धारिका एक अथवा अनेक असू शकतात. एकाहून अधिक धारिका वापरल्यामुळे संदर्भ हाती लिहिण्याचे कष्ट वाचतात.

संदर्भसामग्री

संदर्भसामग्रीला बिबटेक्-धारिका म्हटले जाते. .bib हा तिचा प्रत्यय असतो. ह्या धारिकांमध्ये एक अथवा अनेक नोंदी असतात. (प्रत्येक संदर्भाकरिता एक ह्याप्रमाणे) व प्रत्येक नोंदीत वेगवेगळ्या उपनोंदी असतात. उदा.

@article{Thomas2008,
 author = {Thomas, Christine M. and Liu, Tianbiao and Hall, Michael B.
       and Darensbourg, Marcetta Y.},
 title  = {Series of Mixed Valent {Fe(II)Fe(I)} Complexes That Model the
       {H(OX)} State of [{FeFe}]Hydrogenase: Redox Properties,
       Density-Functional Theory Investigation, and Reactivity with
       Extrinsic {CO}},
 journal = {Inorg. Chem.},
 year  = {2008},
 volume = {47},
 number = {15},
 pages  = {7009-7024},
 doi   = {10.1021/ic800654a},
}
@book{Graham1995,
 author  = {Ronald L. Graham and Donald E. Knuth and Oren Patashnik},
 title   = {Concrete Mathematics},
 publisher = {Addison-Wesley},
 year   = {1995},
}

ही एका लेखाची व एका पुस्तकाची नोंद असलेली धारिका आहे. हे सर्वात प्रचलित नोंदींचे प्रकार आहेत. बिब्-धारिकेतील प्रत्येक नोंद @ ह्या चिन्हाने सुरू होते व प्रत्येक उपनोंद महिरपी कंसांत लिहिली जाते.

वेगवेगळ्या उपनोंदी त्यांचे नाव व त्यांची किंमत ह्या स्वरूपात लिहिल्या जातात. प्रत्येक नोंदीची एक कळ असते. तिला मात्र वेगळ्याने किंमत द्यायला लागत नाही. ही कळ टेक्-धारिकेत लिहूनच संदर्भ प्राप्त केले जातात. ती कळ काहीही असू शकते. सामान्यतः वापरली जाणारी पद्धत ही आहे की लेखकाचे नाव व प्रकाशनवर्ष कळ म्हणून लिहावे, परंतु ते सक्तीचे नाही.

कोणत्या उपनोंदी एखादी नोंद पूर्ण होण्याकरिता आवश्यक आहेत हे तुम्ही निवडलेल्या नोंदीच्या प्रकारावरून ठरते. तरी काही उपनोंदी ह्या बहुतांश प्रकारांमध्ये लागतातच. author ही उपनोंद त्यांपैकी एक. ह्या उपनोंदीतील प्रत्येक नाव and ह्या शब्दाने वेगळे केले जाते. बिब्-नोंद कुठल्याही भाषेतील असो, अनेक लेखकांची नावे लिहिताना and हा शब्दच वापरावा लागतो. हे अतिशय आवश्यक आहे. फलितात सर्व नावे व्यवस्थित छापली जाण्याकरिता लेखकांची नावे सुटी असणं आवश्यक आहे. उपनोंदींमधील काही शब्द पुन्हा महिरपी कंसांत लिहिल्याचे आढळतात. आज्ञावलीने त्यांच्या अक्षरांत (उदा. स्मॉल वि. कॅपिटल) कोणताही बदल करू नये ह्यासाठी त्यांना महिरपी कंसांत लिहावे लागते.

.bib धारिका हाताने संपादित करणे अतिशय कठीण ठरू शकते. त्यामुळे बहुतेक वेळा बिब्-संपादक वापरणे उपयुक्त ठरते. जॅबरेफ़् हा असाच एक आंतरप्रणाली बिब्-संपादक आहे. अर्थात ह्याप्रमाणेच आणखी अनेक संपादक उपलब्ध आहेत. जर संदर्भात DOI (डिजिटल ऑब्जेक्ट आयडेन्टिफायर) असेल, तर doi2bib ही आज्ञावलीदेखील वापरून पाहता येईल. फक्त कोणतीही स्वयंचलित प्रणाली वापरून संदर्भ मिळवल्यावर, सगळे योग्य आहे ना ह्याची खात्री करून घेणे कधीही श्रेयस्कर.

ह्या प्रकरणात आपण एक लहानशी संदर्भसामग्री तयार करूया व वापरूया. ह्या धारिकेचे नाव आम्ही learnlatex.bib असे ठेवले आहे.

संदर्भसामग्रीतील माहितीचा वापर

संदर्भसामग्रीतील माहिती लाटेक्-आज्ञावलीत समाविष्ट करण्यासाठी तीन पायऱ्या आहेत. सर्वप्रथम तुमची लाटेक्-धारिका चालवणे. ह्या प्रक्रियेमुळे एक साहाय्यक धारिका तयार होते जिच्यात तुमच्या आज्ञावलीत किती वेळा व कोणते संदर्भ दिले गेले आहेत हे नोंदवले जाते. दुसरी पायरी एक आणखी आज्ञावली चालवण्याची जिच्यामुळे संदर्भसामग्रीतून दस्तऐवजात वापरल्या गेलेल्या संदर्भांची माहिती गोळा होईल व ती क्रमाने लावली जाईल. तिसरी पायरी पुन्हा एकदा लाटेक्-धारिका चालवण्याची. ह्या पायरीत क्रमाने लावलेली संदर्भसामग्रीतील माहिती फलितात योग्यरीत्या छापली जाईल.

दुसऱ्या पायरीकरिता दोन प्रचलित आज्ञावल्या आहेत. बिबटेक् व बिबर. बिबर ही आज्ञावली प्रामुख्याने बिबलाटेक् आज्ञासंचासह काम करते. बिबटेक् मात्र कोणत्याही आज्ञासंचासह, कोणत्याही आज्ञासंचाशिवाय व natbib आज्ञासंचासह काम करते.

ह्या तीन पायऱ्या निरनिराळ्या संपादकांमध्ये निरनिराळ्या प्रकारे हाताळल्या जातात. आमच्या संकेतस्थळावर आम्ही पडद्यामागे अशी आज्ञावली लिहिली आहे जिच्यामुळे ह्या तिन्ही पायऱ्या एकाच वेळी पार पडतात.

संदर्भांचे स्वरूप व संदर्भसामग्रीतील माहिती हे दोन्ही स्वतंत्र असतात. संदर्भसामग्रीतील माहितीतून वेगवेगळ्या स्वरूपातील संदर्भ छापता येऊ शकतात ते ह्या व्यवस्थेमुळेच. बिबलाटेक् व बिबटेक् ह्यांमधील फरक आपण पाहूच, परंतु संदर्भाचे स्वरूप काय असायला हवे हे आपण निश्चितच ठरवू शकतो.

natbib आज्ञासंचासह bibtex

कोणत्याही आज्ञासंचाशिवाय संदर्भ वापरणे लाटेक्-मध्ये शक्य असले तरी त्यावर मर्यादा आहेत, त्यामुळे आपण natbib आज्ञासंच वापरणार आहोत. ह्या आज्ञासंचामुळे वापरकर्त्यांना निरनिराळ्या शैलीतील संदर्भ देता येणे शक्य होते.

बीजधारिकेचे साधारण स्वरूप पुढीलप्रमाणे असते.

\documentclass{article}
\usepackage[T1]{fontenc}
\usepackage{natbib}

\begin{document}
The mathematics showcase is from \citet{Graham1995}, whereas
there is some chemistry in \citet{Thomas2008}.

Some parenthetical citations: \citep{Graham1995}
and then \citep[p.~56]{Thomas2008}.

\citep[See][pp.~45--48]{Graham1995}

Together \citep{Graham1995,Thomas2008}

\bibliographystyle{plainnat}
\bibliography{learnlatex}
\end{document}

संदर्भसामग्रीतील नोंदीची कळ टाकून संदर्भ छापता येतो हे तुम्हाला पाहता येत असेल. ह्या आज्ञासंचासह साधे मजकूररूपी व कंसांतील संदर्भ छापता येतात. अनुक्रमे \citet\citep ह्या आज्ञांसह. संदर्भांची शैली \bibliographystyle ह्या ओळीने निवडली जाते. ह्या उदाहरणात आपण plainnat ही शैली निवडली आहे. \bibliography ह्या आज्ञेने संदर्भसूची छापली जाते, ह्याच आज्ञेसह संदर्भसामग्रीच्या धारिकांचीही निवड केली जाते. ही यादी स्वल्पविरामांनी वेगळी केली जाते.

पृष्ठक्रमांकाचे तपशील ओळीअंतर्गत संदर्भात वैकल्पिक कार्यघटकामार्फत दिले जातात. दोन कार्यघटक दिले असले तर त्यातील पहिला संदर्भापूर्वी येतो व दुसरा संदर्भानंतर.

वरील आज्ञावली लेखक-वर्ष ही संदर्भशैली वापरते. अनुक्रमित संदर्भदेखील वापरता येऊ शकतात. त्यांकरिता natbib आज्ञासंचास numbers हे प्राचल वापरावे लागते.

biblatex आज्ञासंच

biblatex हा आज्ञासंच किंचित वेगळ्या प्रकारे काम करतो. ह्या आज्ञासंचासह संदर्भसामग्रीची धारिका आज्ञापीठातच निवडावी लागते. ह्या आज्ञासंचासह काही अधिकच्या आज्ञा शिकाव्या लागतील.

\documentclass{article}
\usepackage[T1]{fontenc}
\usepackage[style=authoryear]{biblatex}
\addbibresource{learnlatex.bib} % file of reference info

\begin{document}
The mathematics showcase is from \autocite{Graham1995}.

Some more complex citations: \parencite{Graham1995} or
\textcite{Thomas2008} or possibly \citetitle{Graham1995}.

\autocite[56]{Thomas2008}

\autocite[See][45-48]{Graham1995}

Together \autocite{Thomas2008,Graham1995}

\printbibliography
\end{document}

\addbibresource ह्या आज्ञेस संदर्भसामग्रीच्या धारिकेचे संपूर्ण नाव (प्रत्ययासहित) लागते. natbib आज्ञासंचासह मात्र .bib हा भाग आपण वगळला होता.

इथेही संदर्भांसकट लहानसा मजकूर वैकल्पिक कार्यघटकांसह जोडता येतो. बिबलाटेक्-सह p.~ किंवा pp.~ ही माहिती मात्र आपोआप भरली जाते.

biblatex ह्या आज्ञासंचासह शैलीची निवड आज्ञासंच वापरतानाच केली जाते. इथे आपण लेखक-वर्ष ही शैली वापरली आहे. (authoryear) ह्या आज्ञासंचासहदेखील अनुक्रमित संदर्भ वापरता येतात. (numeric) तसेच आणखी अनेक शैली ह्या आज्ञासंचासह पुरवल्या जातात.

BibTeX व biblatex ह्यांपैकी एकाची निवड

ह्या दोन्ही आज्ञासंचांमार्फत संदर्भसामग्रीतील धारिकेतूनच माहिती गोळा केली जाते, परंतु त्यांची काम करण्याची पद्धत प्रचंड वेगळी आहे व त्याची ओळख करून घेतल्यास तुमच्या सोयीने एकाची निवड तुम्हाला करता येईल.

बिबटेक्-सह संदर्भांच्या शैलीची निवड .bst धारिकेमार्फत केली जाते व त्यासाठी \bibliographystyle ही आज्ञा बीजात वापरावी लागते. biblatex आज्ञासंच .bst धारिका वापरत नाही. जर संदर्भांची विशिष्ट शैली ठरवणारी .bst धारिका वापरण्याची आवश्यकता असेल, तर बिबलाटेक् वापरता येणार नाही.

बिबलाटेक्-च्या निराळ्या पद्धतीमुळे आज्ञापीठातच फलितामधील संदर्भांच्या रूपात अनेक बदल करता येणे शक्य आहे. बिबटेक् ह्या आज्ञावलीत अशा प्रकारे बदल करता येणे कठीण आहे. त्यासाठी तुम्हाला लाटेक्-बाह्य बिबटेक् ह्या आज्ञावलीची ओळख असावी लागते. ह्या कारणामुळे बिबलाटेक् अधिक लवचीक आहे असे मानले जाते.

बिबलाटेक्-सह विस्तृत संदर्भांची हाताळणी उत्तम होते. हा आज्ञासंच अनेक स्वयंचलित सुविधाही पुरवतो. ह्या आज्ञासंचात संदर्भ छापण्याकरिता अनेक निरनिराळ्या आज्ञा आहेत. मानव्यविज्ञानांतील संदर्भांकरिता हा आज्ञासंच उपयुक्त ठरतो.

बिबटेक् केवळ लॅटिन लिपी व इंग्रजी भाषेकरिताच काम करू शकते. बिबलाटेक्-सह युनिकोड आज्ञावली चालू शकते. त्यामुळे इंग्रजीतर भाषांकरिता बिबलाटेक् हीच जास्त चांगली निवड ठरते.

बिबटेक् ही बिबलाटेक्-हून जुनी आज्ञावली असल्यामुळे तिच्यासह काम करणे हे खूप रूढ झाले आहे. अनेक प्रकाशक व नियतकालिके केवळ बिबटेक् वापरणाऱ्या आज्ञावल्याच स्वीकारतात व बिबलाटेक् वापरणे अडचणीचे ठरू शकते.

जर एखाद्या प्रकाशकास अथवा नियतकालिकास लेख पाठवू इच्छित असाल, तर त्यांच्या ह्याविषयीच्या विशिष्ट अपेक्षा आहेत का हे आधी तपासून घ्या. जर तुम्हाला .bst धारिका दिली गेली असेल, तर तुम्हाला बिबटेक् आज्ञावली वापरावीच लागेल. जर तुम्हाला तुलनेने सोपी आज्ञावली व केवळ इंग्रजी भाषेतील संदर्भ वापरायचे असतील तेव्हा बिबटेक् आज्ञावली पुरते. जर त्याहून अधिक गुंतागुंतीची संदर्भशैली व इंग्रजीतर भाषेत संदर्भ हवे असतील, तर बिबलाटेक् वापरणे इष्ट ठरेल.

स्वाध्याय

natbibbiblatex ह्या दोघांची उदाहरणे चालवून पाहा. natbibकरिता तुम्हाला लाटेक्, बिबटेक्, लाटेक्, लाटेक् हा क्रम चालवावा लागेल. बिबलाटेक्-करिता लाटेक्, बिबर, लाटेक् हा क्रम चालवावा लागेल. तुमच्या संपादकात हे कसे करायचे ते शिकून घ्या अथवा महाजालीय सेवा वापरा.

जेव्हा संदर्भसामग्रीत बदल केला जातो व नवीन संदर्भांची भर घातली जाते, तेव्हा फलितात काय बदल होतो ते पाहा. natbib आज्ञासंचाच्या numeric प्राचलासह व biblatexच्या style=numericसह फलित मिळवून पाहा.