प्रकरण २

लाटेक् आज्ञावलीचा वापर

ह्या प्रकरणात टेक्-वितरण म्हणजे काय? काही प्रसिद्ध टेक्-वितरणे कोणती, चांगले टेक्-संपादक व महाजालावरील टेक्-संसाधने ह्यांबाबतची चर्चा आली आहे.

संगणकावरील काही इतर आज्ञावल्यांप्रमाणे, लाटेक् ही आज्ञावली एकाच स्तरावर काम करणारी नाही. लाटेक् दोन स्वतंत्र स्तरांवर काम करणारी आज्ञावली आहे. त्यांचे विभाजन आपण पुढीलप्रमाणे करू:

टेक्-वितरणे

लाटेक्-सह काम करताना टेक्-वितरण सर्वात महत्त्वाचे असते. टेक्-वितरणामध्ये काही पडद्यामागील आज्ञावल्या व धारिका असतात, ज्यांमुळे लाटेक् कार्य करू शकते, परंतु बहुतांश वेळा वापरकर्ते ह्या धारिकांना प्रत्यक्ष पाहत नाहीत.

सद्यस्थितीत दोन महत्त्वाची टेक्-वितरणे उपलब्ध आहेत, मिक-टेक्टेक्-लाईव्ह. दोन्ही वितरणे लिनक्स, विंडोज् व मॅक ह्या प्रणाल्यांवर उपलब्ध आहेत. मिक-टेक् विंडोज् वापरकर्त्यांकरिता अधिक उपयुक्त आहे; मॅक वापरकर्त्यांकरिता टेक्-लाईव्हचे मॅक-टेक् हे उपवितरण उपलब्ध आहे. प्रत्येक टेक्-वितरणाचे काही फायदे आहेत. लाटेक् प्रकल्पाकडून देण्यात येणारे काही सल्लेदेखील पाहा.

टेक्-लाइव्ह हे टेक्-वितरण सर्व कार्यप्रणाल्यांवर उपलब्ध असल्याने व त्याचे काही कार्यकारी फायदे असल्यामुळे ह्यांपैकी एक निवडताना अडचण होत असेल, तर टेक्-लाइव्हची शिफारस आम्ही करू.

संपादक

लाटेक्-बीजधारिका केवळ पाठ्यरूपी असतात व त्यामुळे कोणत्याही संपादकासह त्यांत बदल करता येतात, परंतु लाटेक्-केंद्री संपादकांचा वापर काही वेळा उपयोगी ठरतो, कारण एका टिचकीसह धारिका चालवणे, अंतर्भूत असणारा पीडीएफ्-वाचक, धारिकेतील आज्ञांना ठळकपणे दाखवण्याची सोय असे काही फायदे लाटेक्-संपादकांसह मिळतात. शिवाय बहुतांश संपादकांसह सिंक-टेक् ह्या आधुनिक आज्ञावलीचा वापर करून बीजधारिकेतून फलितधारिकेत (तसेच ह्याउलट) थेट पोहोचण्याची सुविधा वापरता येते.

पुष्कळ लाटेक्-संपादक आज उपलब्ध आहेत. त्यांची एक समावेशक यादी स्टॅक-एक्सचेन्जवर उपलब्ध आहे. टेक्-वर्क्स हा लाटेक्-संपादक टेक्-लाईव्ह व मिक-टेक् ह्या वितरणांसह विंडोज व लिनक्स प्रणाल्यांवर उपलब्ध आहे, तसेच टेक्-शॉप मॅक-टेक् ह्या वितरणासह उपलब्ध आहे.

तुम्ही जो लाटेक् संपादक निवडाल तो तुमच्या संगणकावर टेक्-वितरण बसवल्यानंतरच स्थापित करा. त्यामुळे त्याला टेक्-वितरणातील पत्ते आपसुक मिळतात.

महाजालावर लाटेक्

आज महाजालावर अनेक संकेतस्थळे आहेत जी टेक्-वितरण व टेक्-संपादक नसतानाही लाटेक् आज्ञावल्या चालवून फलित धारिका देऊ शकतात. ह्या संकेतस्थळांवर तुमच्या बीजधारिका संपादित करता येतात. त्यावर पडद्यामागे लाटेक् आज्ञावली चालवली जाते व पीडीएफ् फलितधारिका दाखवली जाते.

काही संकेतस्थळांवर खात्याशिवाय लाटेक् वापरता येते. आम्हीदेखील असेच एक संकेतस्थळ वापरत आहोत ज्याचे नाव लाटेक् सीजीआय आहे. ह्या संकेतस्थळासह लाटेक् आज्ञावलीचे संपादन करता येते व संपादित धारिका चालवताही येतात. आणखी पद्धतशीरपणे काम पूर्ण करण्याकरिता काही संकेतस्थळांवर खाते तयार करता येते व लाटेक् धारिका चालवता येतात. खाते तयार केल्यामुळे संकेतस्थळास तुमचे काम जतन करता येते व संकेतस्थळावर येणारा बोजा कमी करता येतो. इथले काही दुवे वापरून तुम्ही ओव्हरलीफ, ह्या प्रसिद्ध महाजालावरील संपादकावर धारिका चालवू शकता. ह्याव्यतिरिक्त काही संकेतस्थळे आहेत. उदा. पापीरिया.

लाटेक्-सह मराठी वापरायचे असेल, तर टेक्-वितरण संगणकावर बसवून घेणे कधीही सोयीस्कर ठरेल. लाटेक्-ची प्राथमिक भाषा इंग्रजी आहे व त्यामुळे इतर लिप्या दर्शवण्यासाठी त्याला अनेक आज्ञासंचांची गरज पडते. ते सर्व आज्ञासंच पूर्वीपासूनच बसवले असले, तर मराठी मजकूर असणाऱ्या धारिका सहज वापरता येतात. शिवाय त्यामुळे आपल्याला हवे असलेले टंक लाटेक्-सह वापरता येतात. केवळ इंग्रजी मजकूर वापरण्याकरिता महाजालावरील संपादक चालू शकतात.

इतरांसोबत काम करणे

जर तुम्हाला लाटेक्-बीजधारिका अशा ठिकाणी पाठवायच्या असतील जिथे त्या चालवून त्यांचे फलित प्राप्त केले जाते, तर त्यांची नियमावली पाहून तिच्यानुसार बीजधारिका लिहिणं आवश्यक आहे.

सराव

तुमच्या संगणकावर टेक्-वितरण बसवून घ्या अन्यथा महाजालावरील संपादकावर आपले खाते उघडा. संगणकावर टेक्-वितरण बसवत असाल, तर एक संपादकदेखील बसवून घ्यावा लागेल. इमॅक्स, टेक्-वर्क्स, टेक्-स्टुडिओ (वर पाहा) ह्यांसारख्या संपादकांपासून सुरुवात करा, त्यानंतर तुमच्या पसंतीचे इतर संपादकदेखील वापरून पाहा.

तुम्हाला येथे महाजालावरच सर्व उदाहरणे चालवून बघता येतील, पण संगणकावर धारिका तयार करून वापरण्याची सवय करून घेणे कधीही चांगले, म्हणून त्याची तयारी करून घ्या.