मदत

संकेतस्थळ पाहणे

हा अभ्यासक्रम १६ प्रकरणांचा बनला आहे. त्यांची यादी मुखपृष्ठावरील अनुक्रमणिकेत पाहता येईल.

प्रत्येक प्रकरणात आणखी एका संबंधित प्रकरणाचा दुवा आहे. त्या प्रकरणात संबंधित विषयाचा आणखी सखोल आढावा घेण्यात आला असेल. इतर कोणतेही वाचन न करता ह्या १६ प्रकरणांतील सामग्रीवर काम करता येणे शक्य आहे.

शेवटी अभ्यासक्रमासाठी वापरल्या गेलेल्या भाषेचा वापर लाटेक्-सह कसा करावा ह्याच्या शिकवण्या आहेत. शेवटी लाटेक्-च्या विविध क्षेत्रांतील वापराची उदाहरणे देणारा संग्रहदेखील आहे.


उदाहरणे चालवणे

प्रत्येक उदाहरण एक लाटेक्-धारिकाच आहे. त्यातील आज्ञावली टेक् प्रत्ययांसह जतन करून विविध चालकांसह चालवता येते. पुढील उदाहरण पाहा.

%!TeX lualatex
\documentclass{article}
\usepackage{marathi}

\begin{document}
नमस्कार.
\end{document}

ही उदाहरणे परिपूर्ण आहेत, परंतु तुम्ही त्यांच्यात बदलदेखील करू शकता. येथे वापरला जाणारा लाटेक्-संपादक एस हा आहे.

लाटेक् आज्ञावली चालवण्याच्या तीन पद्धती

ओव्हरलीफ वापरणे

ओव्हरलीफ ही लाटेक् आज्ञावली चालवण्यासाठीची सर्वात लोकप्रिय सेवा आहे. उदाहरणांखाली आढळणारी ही कळ आज्ञावली ओव्हरलीफ संकेतस्थळास सादर करते.

ओव्हरलीफवर जर आपले खाते नसेल अथवा आपण खात्यात प्रवेश केला नसेल, तर आपल्याला एका पानावर पाठवले जाईल जेथे आपण खात्यात प्रवेश घेऊ शकता अथवा खाते नोंदवू शकता. ही विनामूल्य सुविधा आहे, परंतु तुम्हाला काही वैयक्तिक तपशील द्यावे लागतात व काही अटींना मंजूरी द्यावी लागते.

जर तुम्ही खात्यात प्रवेश केला असेल, तर येथील दुव्यासह ओव्हरलीफवर नवा प्रकल्प तयार होईल व त्यात लाटेक् आज्ञावली आपोआप भरली जाईल. तिथे तुम्हाला आज्ञावलीचे संपादनदेखील करता येईल. तिथे आज्ञावली चालवून फलित दाखवले जाईल, तसेच आज्ञावलीतील अडचणीदेखील दाखवल्या जातील.

ओव्हरलीफवरील संपादक ह्या संकेतस्थळावरील संपादकाहून खूप प्रगत आहे, शिवाय तिथे धारिका जतन करून ठेवण्याची सुविधादेखील आहेच. तुम्ही कोणत्याही संगणकावरून ओव्हरलीफ खात्यात प्रवेश केलात, तरी तुम्हाला तुमचे लाटेक् प्रकल्प तिथे पाहता येतात.

लाटेक् ऑनलाईन

कळेचा वापर करून ह्याच संकेतस्थळावरील लाटेक् सेवेचा वापर करता येतो.1

लाटेक् सीजीआय ही सेवा ह्या संकेतस्थळास पूरक ठरावी म्हणूनच विकसित करण्यात आली. ती PDF.js ह्या आज्ञावलीचा वापर करून पीडीएफ्-फलित प्रदर्शित करते. ह्याकरिता त्या यंत्रणेत पीडीएफ्-प्रदर्शक असण्याचीही पूर्वअट नाही.

ह्या सेवेचा वापर केल्यास पीडीएफ्-फलित आज्ञावलीखाली लगेच दाखवले जाते. ह्या कळेद्वारे तयार झालेले फलित काढून टाकले जाईल अथवा फलित तसेच ठेवून उर्वरित प्रकरण वाचता येऊ शकेल.

हा अभ्यासक्रम करण्याकरिता तसेच लाटेक् ऑनलाईन सेवा वापरण्याकरिता कोणत्याही खात्याची गरज नाही. ह्यामुळे उदाहरणे चालवून पाहणे खूप सोपे होते, परंतु हे संकेतस्थळ तसेच लाटेक्-सीजीआय, लाटेक्-ऑनलाईन अथवा लाटेक्-ऑन-एचटीटीपी ही संकेतस्थळे तुम्ही तयार केलेली धारिका जतन करून ठेवण्यासाठीची सोय पुरवत नाहीत. त्यामुळे संकेतस्थळावरून दूर गेल्यास तुम्ही केलेले सर्व बदल नष्ट होतात.

संगणकावरील टेक्-वितरण वापरणे

जर तुमच्या संगणकावर टेक्-वितरण बसवले असेल, तर तुम्ही येथील आज्ञावलीची नक्कल करू शकता. ती तुमच्या पसंतीच्या लाटेक्-संपादकासह संपादित करून, जतन करू शकता व लाटेक्-सह चालवू शकता.

अडचणी

ह्या संकेतस्थळावर पुरवलेली उदाहरणे अद्ययावत् टेक्-वितरणांसोबत वापरून पाहिली आहेत. ती सर्व योग्य फलित निर्माण करतात. ही आज्ञावली जर तुमच्या संगणकावर अडचणी निर्माण करत असेल, तर तुम्ही तुमचे टेक्-वितरण अद्ययावत् आहे की नाही हे तपासून पाहणे उचित ठरेल.


टेक्-चालकाची निवड

ह्या संकेतस्थळावर मूलभूत चालक म्हणून पीडीएफ्-लाटेक् ह्या चालकाची निवड करण्यात आली आहे. परंतु आज्ञावलीत fontspec हा आज्ञासंच असेल, तर झीलाटेक् हा चालक वापरला जाईल.

पुढील ओळ जर आज्ञावलीच्या सुरुवातीला टाकलीत तर तुम्हाला हवा तो चालक आज्ञावलीद्वारे निवडता येतो.

% !TEX मजकूर lualatex

% व ! ह्या चिन्हांतील मोकळी जागा व मजकूर आज्ञावलीद्वारे दुर्लक्षिले जातात.

% !TEX program=pdflatex ह्या आज्ञेप्रमाणेच वरील आज्ञेचे काम आहे. परंतु program= ह्या शब्दाची गरज नाही. तूर्तास केवळ ५ चालक ह्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

ह्या अभ्यासक्रमात ही आज्ञा वापरलेली काही उदाहरणांमध्ये. पाहता येऊ शकते.

जर पीलाटेक् अथवा अपलाटेक् हे चालक निवडले गेले, तर डीव्हीआयपीडीएफ्-एमएक्स ही आज्ञावलीदेखील आपोआप वापरली जाते.


फलित कसे पाहावे?

जर लाटेक् ऑनलाईन सेवेचा वापर करून आपण आज्ञावली चालवली, तर पीडीएफ्-फलित PDF.js सुविधेसह दाखवले जाते. ह्या सेवेद्वारे बहुतांश शोधप्रणाल्यांमध्ये फलित नीट दाखवले जाते.

जर तुम्हाला शोधइंजिनातील पीडीएफ्-प्रदर्शक अथवा तुमच्या संगणकावरील पीडीएफ्-प्रदर्शक वापरायचा असेल, तर पुढील आज्ञेचा समावेश बीजधारिकेत करावा.

% !TEX मजकूर pdf

pdfjs असा कार्यघटक देऊन ह्याचे फलित निश्चित करता येते. अडचणी सोडवण्याकरिता तुम्हाला लॉग धारिका पाहण्याची गरज पडू शकते. log हे प्राचल वरील आज्ञेत वापरून हे साधता येऊ शकते.


  1. ह्या प्रकल्पाच्या निर्मितीच्या वेळी आम्ही LaTeX.OnlineLaTeX-on-HTTP ह्या दोन संकेतस्थळांचा वापर केला. ह्या सेवांच्या निर्मात्यांचे आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत. त्यांच्या योगदानामुळे ह्या संकेतस्थळावरील उदाहरणे त्यांच्या पूर्वावस्थेत वापरण्यायोग्य झाली.